गडमुडशिंगी ग्रामपंचायतीमध्ये तातडीने ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा;प्रशासक अश्विनी शिरगावे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी: कारभार ठप्प

गांधीनगरसुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या असलेल्या गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा कारभार गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी उपलब्ध नसल्याने पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, दाखले-उतारे, कर्मचाऱ्यांचे वेतन आदी अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या असून तातडीने कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासक अश्विनी शिरगावे यांनी शिष्ट मंडळासह जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे यांची करवीर पंचायत समितीमार्फत अचानक बदली करण्यात आली. त्यानंतर राहुल खोत यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र त्यांनी दोनच दिवसांत रजा घेतली. त्यानंतर दाखले व उतारे देण्यापुरते दिलीप तेलवी यांची केवळ आठ दिवसांसाठी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. मात्र कायमस्वरूपी अधिकारी न मिळाल्याने ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.परिणामी गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजबिल, पाणीपट्टी, कचरा संकलन यांसह अनेक अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे डिझेल बिल थकल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्राधिकरणाचे थकीत बिल असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद झाला आहे. तसेच दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्याने सुमारे ५० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा निवेदनात नमूद आहे.

यावेळी मा .जि.प. सदस्य बाबासाहेब माळी मा. ग्रा.प. रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, दिलीप थोरात, संजय सकटे, संजय पाटील, विनोद सोनुले, संदीप गौड, बाबासो कांबळे, सुकुमार देशमुख, उत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 8080365706