कोल्हापूर:राज्यातील युवा वर्ग भाजपशी जोडला जावा आणि पक्षाची ध्येय, धोरणं समाजाच्या तळागाळापर्यंत पोचावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने युवाशक्ती जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. मुंबईपासून सुरू झालेली ही यात्रा राज्याच्या कानाकोपर्यात फिरणार आहे. प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सिंधुदुर्ग जिल्हयात पोचली. यावेळी कार्यकर्त्यांनी या यात्रेचे जल्लोषी स्वागत केले. या दरम्यान महाडिक यांनी कणकवली मध्ये मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. युवा जागर यात्रेच्या उपक्रमाचे नामदार नितेश राणे यांनी कौतुक केले.

युवाशक्ती जागर यात्रेचा हेतू आणि राज्यभर मिळणारा प्रतिसाद, याबाबत कृष्णराज महाडिक यांनी, नामदार नितेश राणे यांना सविस्तर माहिती दिली. त्यावर संपूर्ण राज्याचा कानाकोपरा या यात्रेद्वारे पिंजुन काढा आणि समाजातील सर्वच घटकांना विशेषत: युवा वर्गाला भाजपच्या विचारधारेत आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करा, असा सल्ला नामदार नितेश राणे यांनी दिला. या दरम्यान युवाशक्ती आणि भाजपच्या पदाधिकार्यांचा मेळावाही पार पडला. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी, भाजपच्या ध्येयधोरणांबाबत तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना युवा वर्गासह समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सर्वच पदाधिकार्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हयातील संघटनात्मक बळकटीकरण आणि युवा मोर्चाच्या आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साठम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम राजेभोसले, सभापती प्रितेश राऊळ, मिलींद मेस्त्री, अशोक सामंत, श्वेता कोरगांवकर, दिलीप तळेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
