कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील म्युझिकल पोल बंद असल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकार्यांना धारेवर धरले. पोल बंद का? मेंटेनन्स का करत नाही? आम्ही केलेल्या विकासकामात जाणीवपूर्वक खोडा घालून जाणीवपूर्वक पोल बंद पाडले जातात काय? असा जाब विचारून अधिकार्यांची खरडपट्टी केली. तत्काळ पोलमधून आई अंबाबाई आरतीसह इतर भक्तिगिते सुरू करा, असे आदेशही दिले.

श्री अंबाबाई मंदिर परिसरात हेरीटेज लूकचे म्युझिकल पोल उभारण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. सकाळनंतर दिवसभर अंबाबाई देवीच्या भक्तिगीतांनी परिसरात चैतन्य निर्माण होत होते. गेले काही दिवस म्युझिकल पोल बंद पडू लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे केल्या. यावर तात्काळ आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
महापालिकेच्यावतीने त्याचा वेळेवर मेंटेनन्स केला नसल्याने भाविकांतून संताप व्यक्त होत आहे. निधी आम्ही आणायचा, शहर विकासासाठी काम करायचे. पण महापालिका आणि संबधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पोल बंद पडल्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापून येणे हि संबधित यंत्रणेच्या अकार्यक्षमतेची लक्षणे आहे. यामुळे आमची नाहक बदनामी होत आहे. पर्यटनवाढी साठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहे. पण, अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे या पोल्सच्या दुरुस्तीसाठी राखीव ठेवलेल्या निधीतून अभियंत्यांची नियुक्ती करावी. आवश्यक असणारी यंत्र सामुग्री संबधित ठेकेदाराकडून मागवून त्याची उपलब्धता ठेवावी, अशा सूचना यावेळी दिल्य
लोकप्रतिनिधींचे काम निधी आणून देणे…
श्री अंबाबाई देवीचे मंदिर आपल्या मतदारसंघात असल्याने विशेष प्रयत्न करून मंदिर व परिसर सुशोभिकरणासाठी २ कोटी ८५ लाखांचा निधी आणला. त्यातंर्गत मंदिर परिसरात हेरिटेज लूकचे म्युझिकल पोल उभारण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होते. लोकप्रतिनीधी म्हणून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार. त्यानंतर कामे करून घेणे आणि मेंटेनन्स राखणे ही कामे महापालिका आणि देवस्थान समिती यांची आहेत, असेही आ. क्षीरसागर म्हणाले.
यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रमाकांत आडसूळ, शहरअभियंता रमेश मस्कर, विद्युत विभागाचे दळवी, शिवसेना परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
