कडोली येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाला अवैध साठवणूक व घाऊक विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई

कोल्हापूर: कडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाला अवैध साठवणूक व घाऊक विक्री होत असल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सिव्हील सर्जन कार्यालय कोल्हापूर,अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली.

 

या कारवाईत जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) श्री. विजय पाचपुते तसेच कडोली पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री. आर. ए. पाटील व ग्उपजिल्हा रुग्णालय कडोली च्या दंतचिकित्सक डॉ भूमिका फतेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कडोली बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय व परिसरातील विविध ठिकाणी तपासणी केली.
सदर मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक व वापर आढळून आल्याने एकूण १३ जणांवर सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार नियमन) अधिनियम २००३ (COTPA Act 2003) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ₹२,६००/- इतका दंड वसूल करण्यात आला.
कारवाईदरम्यान संबंधितांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व विक्रीबाबत कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

“*तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी अशा संयुक्त धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, नागरिकांनीही कायद्याचे पालन करून व्यसन,तंबाखू मुक्त समाज करणे कामी प्रशासनाला सहकार्य करावे.”*-डॉ व्ही ए आरळेकर (जिल्हा सल्लागार (एनटीसीपी) जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यालय कोल्हापूर)

सदर कारवाईमुळे परिसरातील प्रतिबंधित गुटखा, सुगंधी पान मसाला अवैध साठवणूक व घाऊक
विक्रीवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहेत.
सदर धडक कारवाई मोहिमी कामी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रशांत वाडीकर, अन्न व औषध प्रशासन चे श्री शिर्के आणि कडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री कोडग यांचे सहकार्य लाभले.

🤙 8080365706