भाजपच्या सुवर्णा पाटील कागल पंचायत समितीच्या पहिल्याच सभापती; राजे गटाला ३४ वर्षांनंतर संधी,मुश्रीफ गटाचे इंद्रजीत पाटील उपसभापती

कागल :कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या तसेच शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे गटाच्या सुवर्णा पाटील यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाचे इंद्रजीत पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

 

येथील पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार तथा पीठासन अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे व सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर उपस्थित होते.
कागल पंचायत समितीच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास पहिल्यांदाच सभापतीपदाचा मान मिळाला आहे. तसेच राजे गटाला तब्बल ३४ वर्षांनंतर सभापतीपदाची संधी मिळाली. यापूर्वी १९९२ साली राजे गटाचे अमरसिंह घोरपडे हे सभापती होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे तहसीलदार वाकडे यांनी जाहीर केले. प्रशासनाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व सदस्यांसह शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, नगराध्यक्षा सविता माने, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, बँकेचे संचालक एम. पी. पाटील, मनोज फराकटे, शशिकांत खोत, प्रा. सुनील मगदूम यांच्यासह तिन्ही गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. शाहू साखर कारखान्याच्या प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर सभापती सुवर्णा पाटील म्हणाल्या :
कागल पंचायत समितीच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाचा पहिला सभापती होण्याचा मान मला मिळाला, ही अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे नेते राजे समरजितसिंह घाटगे, नामदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनामुळे ही संधी मला मिळाली.
१९९२ साली राजे गटाचे बाळ घोरपडे यांच्या नंतर तब्बल ३४ वर्षांनी राजे गटाच्या सदस्याला सभापतीपदाची संधी मिळाली आहे. माझे सासरे स्वर्गीय गणपतराव पाटील आणि वडील स्वर्गीय एस. के. मगदूम यांनी सहकार महर्षी स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जपलेला समाजसेवेचा व सहकाराचा वारसा पुढे चालवत पंचायत समितीच्या माध्यमातून गट-तट न पाहता पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करू.
रस्ते, गटर्स, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसह कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्यात अग्रेसर राहील यासाठी नियोजनबद्ध काम केले जाईल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

🤙 8080365706