नानीबाई चिखलीच्या  शिवानी भोसले यांना आपली मुलगी, बहीण, सून मानून ओट्यात घ्या मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

नानीबाई चिखली:नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. शिवानी विजयसिंह भोसले यांना आपली मुलगी, बहीण, सून मानून ओट्यात घ्या, अशी भावनिक हाक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच; नानीबाई चिखली पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. सुवर्णा भाऊसाहेब जाधव व हळदी पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. मनीषा विलास पाटील यांनाही प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

नानीबाई चिखली ता कागल येथे नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजना आणताना उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून तिजोरीच्या किल्ल्या होत्या. महिला व बालकल्याण मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते. त्यामुळे या योजनेवर आमचाच हक्क राहतो. येत्या काळात लवकरच लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देणार, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, सत्यजित पाटील- सोनाळीकर, कैलाससिंह जाधव, राजेखान जमादार, राहुल मगदूम- महाडिक यांच्यासारख्या युवा उद्योजकांचे राष्ट्रवादी व भाजपच्या युतीला पाठबळ मिळत आहे. त्यांच्या व्यावसायिक आणि टेक्निकल ज्ञानाचा उपयोग करून तालुक्यातील युवक व महिलांच्या रोजगारवाढीला प्राधान्य देणार आहोत.

त्यांना एवढे दुःख वाटायची गरज काय…?
मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, काल नानीबाई चिखलीत झालेल्या विरोधकांच्या सभेतून सौ. शिवानी भोसले यांचे आरटीओ असलेले पती विजयसिंह भोसले यांना बदलीवरून इशारा देण्याचा प्रयत्न झाला. भोसले कुटुंबीय तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच पक्षात आहेत. असे असूनही काल उपमुख्यमंत्र्यांना ही माहिती पुरविणाऱ्यांना याचे एवढे मोठे दुःख वाटायची गरजच काय, असा सवालही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केला.

बेरोजगारांना नोकऱ्या व शेतकऱ्यांना उत्पादन वाढ
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तालुक्याचे कल्याण आणि गोरगरिबांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही तिन्ही नेते विधायक विचाराने एकत्र आलो आहोत. तालुक्यात नवनवीन उद्योग आणून बेरोजगारांच्या नोकऱ्यांसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच; ऊसशेतीमध्ये ए. आय. चा वापर करून ऊस उत्पादन वाढवण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावेल.

शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, आम्ही तीन नेते काम करणारे आहोत. कामाच्या जोरावर आम्ही मते मागत आहोत. आमचं काम बोलतय. ज्यांचं काही कामच नाही त्यांच्यावर काय टीका करायची. कालच्या भाषणात त्यांनी चिखलीच्या महापुराविषयी, हळदीच्या पाण्याविषयी वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. कागलच्या विकासासाठी आम्ही तिघेजण एकत्र आलो आहोत. सर्वत्र एकसंघपणे प्रचार सुरू आहे. सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. त्यामुळे केवळ चिखलीच नाही तर आमच्या युतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील.

गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, ही निवडणूक नेत्यांची नाही तर कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे यातून नेत्यांना काहीही मिळवायचे नाही. तर कार्यकर्त्यांना ताकत देण्यासाठी संघर्ष टाळून नेत्यांनी समझोता केला आहे. या युतीचे सर्व उमेदवार कागल नगरपालिकेच्या निवडणुकीप्रमाणे मोठ्या मताधिक्याने विजयी करुन युती योग्य असल्याचे दाखवून देऊया. भोसले घराण्याचे केवळ चिखलीवरच नव्हे तर परिसरावर उपकाराचे रुण आहेत. यातून उतराई होण्याची संधी त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करुन होऊया.

यावेळी प्रविणसिंह भोसले, विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर उमेदवार सौ. शिवानी भोसले, नानीबाई चिखली पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुवर्णा जाधव व हळदी पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार मनिषा पाटील, अरुण भोसले, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, वाय. टी. पाटील, मंडलिक कारखान्याचे संचालक कैलाससिंह जाधव, सत्यजित पाटील, राजे बँकेचे संचालक एम. पी. पाटील, राजेखान जमादार, राजेंद्र नुल्ले आदी उपस्थित होते.

🤙 8080365706