राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह महेश पाटील, अशोक शिरोलीकर यांचे विजय हीच अजितदादा पवार व पी. एन. पाटीलसाहेब यांना खरी श्रध्दांजली मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन

शिरोली:
पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी, पाडळी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार महेश पाटील, शिरोली दुमाला पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार अशोक शिरोलीकर या सर्वांचे प्रचंड मताधिक्यांचे विजय हीच दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार कै. अजितदादा पवार व दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

शिरोली दुमाला ता. करवीर येथे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र सूर्यवंशी, पाडळी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार महेश पाटील, शिरोली दुमाला पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार अशोक शिरोलीकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा या ग्रामीण विकासाच्या वाहिन्या आहेत. या माध्यमातून आरोग्य, प्राथमिक शिक्षण, स्वच्छता, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा निर्माण होत असतात. तुम्ही या उमेदवारांना संधी द्या आम्ही त्यांना भरपूर विकास निधी देऊ.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर म्हणाले, दिवंगत आमदार स्वर्गीय कै. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या निधनानंतर आम्ही सर्वांनी एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. असे असताना आमचे विरोधक आपल्या निवेदन आणि फलकांवर कै. पी एन पाटीलसाहेब यांचे फोटो वापरत आहेत. त्यांना कळून चुकलय की त्यांचा फोटो लावल्याशिवाय आपल्याला मतेच मिळणार नाहीत. दिवंगत कै. पी एन पाटीलसाहेब आणि त्यांच्या मुलग्याशी आमचे विरोधक किती प्रामाणिक राहिले, असा सवालही श्री. पाटील यांनी केला. हेच विरोधक पी. एन. पाटील यांच्या मुलग्याला आणि कार्यकर्त्याना निष्ठा शिकवायला लागले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राजू सूर्यवंशी हा हाडाचा कार्यकर्ता……
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषद उमेदवार राजू सूर्यवंशी हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे. ग्रामीण विकासाची नस आणि नस त्यांना माहित आहे. सामान्य माणसांसाठी त्यांनी कष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध लढले आहेत. कोरोना आणि महापुराच्या संकटात ते जनतेसाठी धावून आले आहेत. त्यांनी पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून प्रचंड विकास केलेला आहे. त्यांना जिल्हा परिषदेचे सदस्यपद मिळाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने विकास ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर पोहोचतील.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार कै. अजितदादा पवार व दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यासपीठावर भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, नारायण पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष संभाजीराव पाटील, राजीव गांधी सूत गिरणीचे संचालक चेतन पाटील व बाजीराव पाटील, सत्यजित पाटील, मच्छिंद्र कांबळे, गजानन सुभेदार, संतोष पोर्लेकर, दादासाहेब देसाई, विश्वजीत पाटील, पांडुरंग पाटील, संजय शिपूगडे आदी प्रमुख उपस्थित होते.

🤙 8080365706