प्रचंड मताधिक्याने विजयी करून युती यशस्वी करूया मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कागल:
कार्यकर्त्यांमधील वैरवाद आणि संघर्ष संपविण्यासाठी मी, माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे अशी युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करून युती यशस्वी करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल येथे आयोजित तिन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भव्य नियोजन मेळाव्यात ते बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, संघर्ष टाळण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. एका घटकाने युतीत सहभागी न होता कागल नगरपरिषद निवडणुकीत कामगारांचे स्वतंत्र पॅनेल उभे करून सावतासुभा मांडला. त्यामुळे त्यांना आमच्यासोबत यायचे नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे आम्ही तिघांनी एकत्र येऊन पॅनेल उभे केले. तिघांनीही मनाचा मोठेपणा दाखवत समजूतदारपणा दाखविला आहे.

गाफीलही राहू नका…!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गाव व तालुक्याच्या राजकारणात मागे काय झाले व पुढे काय होणार यावर चर्चा करण्यात वेळ न घालवू नका. मोठ्या संख्येने मतदान होण्यासाठी प्रयत्न करूया आणि युतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करूया. तसेच; ते एकटे आहेत म्हणून त्यांना कमी लेखू नका आणि तीन गट एकत्र आहेत म्हणून गाफीलही राहू नका. प्रत्येक मतासाठी काटेकोरपणे काम करा.

गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तीन प्रमुख गट एकत्र आले आहेत. त्यामुळे संघर्ष टळून विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी एकसंघपणे काम करावे.

राजे बँकेचे संचालक एम. पी. पाटील म्हणाले, कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरवासीयांनी भाजप-राष्ट्रवादी युतीच्या बाजूने कौल दिला आहे. त्याचीच पुनरावृत्ती ग्रामीण भागातील जनता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्कीच करणार आहे.

यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, माजी चेअरमन रणजीत पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, संदीप नेर्ले, विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, धनराज घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706