कसबा सांगाव:कागल तालुक्यातील वाद-विवाद व संघर्ष संपून जनतेत सलोखा नांदावा म्हणून मी, नामदार हसनसाहेब मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे अशी युती केली आहे. त्यामुळे काही इच्छुकाना थांबावे लागले. परंतु; त्यांनी आमच्या गटाशी बंडखोरी करीत विरोधकांची उमेदवारी स्वीकारलेली आहे. ते सांगत आहेत मी राजेंचाच आहे. निवडून आल्यानंतर मी राजेंचाच राहणार आहे. परंतु; मी आजच स्पष्ट करतो कि, त्या बंडखोरांचे आणि आमचे राजकीय संबंध संपलेले आहेत, असे स्पष्टीकरण शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कसबा सांगाव ता. कागल येथे कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुवर्णा रणजित कांबळे, कसबा सांगाव पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. तेजस्विनी राजेंद्र भोरे, मौजे सांगाव पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार अनिलकुमार रामचंद्र हेगडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत श्री. घाटगे बोलत होते.
राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने संघर्ष टाळून समझोत्यातून कागलच्या विकासाठी आम्ही तिघेजण एकत्र आलो. त्यामुळे युतीमध्ये सर्वच गटांना त्याग करावा लागला. युती झाल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांच्याशी गेल्या दहा वर्षापासूनचा संघर्ष संपला, तर तब्बल २२ वर्षानंतर घाटगे गट एकत्र आला आहे. आम्ही केवळ याच नव्हे तर पुढील निवडणुकांतसुद्धा एकत्र राहणार आहोत.
वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंत झालेला संघर्षआम्ही विसरला आहे, तुम्हीही विसरा. संघर्षात वाया जाणार आमचा वेळ आता कागल तालुक्याच्या विकासासाठी लावणार आहोत. कागलच्या राजकारणात भविष्यात काय होणार, कुणाला काय मिळणार या चर्चांमध्ये वेळ घालवू नका. ते आमच्या पातळीवर सर्व ठरलेले आहे. भविष्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी आपसात समझोता करत गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन लढवाव्यात.
गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, तालुक्यातील संघर्ष व अविश्वासाच्या राजकारणामुळे फार मोठे नुकसान झाले. हे वातावरण संपविण्याची वेळ या निमित्ताने आली आहे.
स्विकृतची संधी सुळकूडला…..!
युतीमुळे अनेक ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या. त्यामुळे मोठी मतदान संख्या असलेल्या सुळकूडसारख्या गावात पात्र असूनही काही जणांना संधी देता आली नाही. रणदिवेवाडीसारख्या लहान गावात युतीमुळे संधी मिळाली. निवडणुकीनंतर स्विकृत सदस्य म्हणून सुळकूड गावाला संधी देऊ, असे स्पष्टीकरण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.
गोकुळचे संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे माजी चेअरमन कृष्णात पाटील, माजी सरपंच रणजीत कांबळे, राजे बँकेचे माजी संचालक बाबासाहेब मगदूम, नीलम कांबळे, किरण पास्ते, राजेंद्र भोरे,राजेंद्र माने, विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे , सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखान्याचे संचालक कैलाससिंह जाधव, सरपंच राहुल खोत, शाहू कृषीचे उपाध्यक्ष सुदर्शन मजले, दीपक चौगुले आदी उपस्थित होते.
अमोल माळी यांनी स्वागत केले. मेहताब मुल्ला यांनी आभार मानले.
