घोटवडे:भोगावती खोऱ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलीकते आणि कै. गणपतराव डोंगळे या तिघांचेही योगदान मोठे आहे. या निवडणुकीत ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत. कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार कु. अमृता डोंगळे, कसबा तारळे पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संग्राम अरूण कलीकते, कौलव पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. पुनम युवराज पाटील यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार कै. गोविंदराव कलिकते, कै. गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घोटवडे ता. राधानगरी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने प्रदीर्घकाळ जनसेवा करायची असेल तर गरीब, सामान्य, दिनदलित, पददलित, युवक, बेरोजगार यांच्या सुखदुःखात मिसळून काम करण्याची गरज आहे. आमचे सर्वच उमेदवार गोरगरिबांच्या कल्याणाच्या कार्यात अग्रभागी राहतील.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, या निवडणुकीत कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलीकते आणि कै. गणपतराव डोंगळे ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत.त्यामुळे या जिल्हा परिषद मतदार संघात प्रचंड मताधिक्याने सर्वच उमेदवारांचा विजय होईल, याची खात्री आहे. अरुणराव डोंगळे यांच्या सहकार्याने या विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पुढे नेऊ. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या नात्याने राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या विजयासाठी त्यांचे योगदान लाभणार आहे. आम्ही सर्वजण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करू.
राष्ट्रवादी नंबर एक असेल….!
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निकालामध्ये नंबर एक असेल. त्यामध्ये राधानगरी तालुक्याचा वाटा सिंहाचा असेल.
धर्माच्या बाजूने उभे राहा……!
श्री. मुश्रीफ म्हणाले, अरुणराव डोंगळे गेली अनेक वर्षे गोकुळ दूध संघाच्या संचालक पदाच्या माध्यमातून सहकारात सेवार्थ आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दुर्दैवाने त्यांच्या घरातच धर्मयुद्ध सुरू झाले आहे. शेवटी जे महाभारतात झाले तेच होणार आहे. धर्म विरुद्ध अधर्मची ही लढाई आहे. तुम्ही सर्वजण धर्माच्या बाजूने उभे रहा.
यावेळी व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे, राष्ट्रवादीचे राधानगरी तालुका अध्यक्ष किसनराव चौगुले, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर, केडीसीसी बँकेचे संचालक रणजिसिंह पाटील, आनंदराव आतवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
