“कोल्हापूर:कोल्हापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोकुळ दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, ज्यांना जिल्ह्याच्या राजकारणात आबाजी म्हणून ओळखले जाते, त्यांनी आता काँग्रेसला सोडचिट्टी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागताच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार सतेज पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास पाटील यांनी आता धनुष्यबाण हाती घेण्याचे निश्चित केले आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे. आबाजींसोबत त्यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
संपूर्ण राजकीय घडामोडीत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जानेवारी रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आबाजींचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती नरके यांनी अधिकृतपणे दिली.
