ईशानीचा संगीतिक प्रवास ग्रामीण कलाकारांसाठी प्रेरणादायी – राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी:ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी, मार्गदर्शन आणि मेहनतीची जोड मिळाल्यास ती राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवू शकते, हे कागलची कन्या ईशानी हिंगे हिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद – सिझन ४’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रतिष्ठित दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठी तब्बल ८ हजार स्पर्धकांमधून तिची निवड होणे, हा केवळ वैयक्तिक यशाचा क्षण नसून ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारा प्रवास असल्याचे गौरवोद्गार शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी काढले.

राजे समरजितसिंह घाटगे व राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी मुंबई येथे ईशानीची भेट घेऊन तिचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, “कागलच्या मातीतील कला, संस्कार आणि सांस्कृतिक वारसा जपत ईशानी सध्या मुंबईत शिक्षण घेत आहे. गायनासोबतच अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रातही तिने आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर तिने विविध मंचांवर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, तिच्या या यशामुळे कागलकरांची मान उंचावली आहे.”
यावेळी सौ. नवोदिता घाटगे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये प्रचंड कला दडलेली आहे. ईशानीचा प्रवास हा त्या सुप्त प्रतिभेला दिशा देणारा असून, तो अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

ईशानीचा कलाप्रवास असाच बहरत राहावा व ती यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करत ग्रामीण कलाकारांसाठी आदर्श निर्माण करावा, अशा शुभेच्छा यावेळी घाटगे दांपत्याने दिल्या.
कागलच्या मातीतील ही कन्या आता चंदेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाल्याने, तिच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण तालुक्यासह कला विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी ईशानीचे वडील अरविंद हिंगे,आई आदिती हिंगे उपस्थित होते.

🤙 8080365706