भुदरगड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ! चांदमवाडी येथे मध्यरात्री गोठ्यात घुसून वासरावर हल्ला; वासरू ठार

कोल्हापूर:भुदरगड तालुक्यातील चांदमवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे. सोमवारी (दि. 23 डिसेंबर) मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात घुसून गायीच्या निष्पाप वासरावर प्राणघातक हल्ला करत त्याला ठार केल्याने संपूर्ण गाव हादरले आहे.

ही घटना शेतकरी सुभाष कानेकर यांच्या गोठ्यात घडली. पहाटे गोठ्याकडे गेल्यावर वासरू रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

गेल्या काही दिवसांपासून भुदरगड तालुक्यासह आसपासच्या भागात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून याआधीही पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रात्री जनावरांची राखण करताना शेतकरी जीव मुठीत धरून उभे राहू लागले आहेत.

या घटनेनंतर चांदमवाडी व परिसरातील गावांमध्ये भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांकडून वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावणे, रात्रगस्त वाढवणे व बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, वनविभागाने नागरिकांना रात्री एकटे बाहेर पडू नये, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत व बिबट्याच्या हालचाली दिसताच तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

 

🤙 8080365706