कोल्हापूर:इस्पूर्ली (ता. करवीर) व वडकशिवाले, दिडनेर्ली परिसरात चोरट्यांनी अक्षरशा धुडगूस घातला असून, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास छोट्या हॉटेल्स, हार्डवेअर व कापड दुकानांना लक्ष्य करून चोरीचे सत्र सुरू आहे. चोरटे दुकानांतील रोख रक्कम, कपडे व साहित्य लंपास करून पसार होत असल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी दिडनेर्ली येथील दिडनेर्ली पाणीपुरवठा संस्थेच्या डीपीमधील कॅपर वायर चोरीला गेली असून, या वायर ची अंदाजे किंमत साडेचार लाख रुपये असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पाणीपुरवठा यंत्रणेलाही मोठा फटका बसला आहे.
इस्पूर्ली पेट्रोल पंप, दिडनेर्ली फाटा व वडकशिवले फाटा परिसरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वडकशिवले फाट्यावरील ‘मोरया’ कापड दुकानातील कपडे चोरट्यांनी लंपास केले, तर एका हॉटेलमधील तेलाचा डबा चोरीला गेला. तसेच छावा चायनीज सेंटरचे कुलूप तोडून तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यात आला आहे. चोरटे रातोरात चोरी करून पसार होत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या सततच्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांनी जणू पोलिस यंत्रणेलाच उघड आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘चोरटे जोमात आणि पोलीस कोमात’ अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, वेळीच चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्यास पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात तातडीने गस्त वाढवून दोषींना पकडण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
