कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हयातील १३ पैकी ११ नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाडयांना सोबत घेवून, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत म्हणून महायुतीनं निवडणूक लढवली. संपूर्ण राज्यात भाजपाला सर्वाधिक जनाधार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला रोखण्यात महायुतीला स्पष्ट यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तसेच नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात महायुतीने यशस्वी कामगिरी केली आहे. शिवाय संघटनात्मक काम, कार्यकर्त्यांची ताकद आणि विकास केंद्रीत प्रचार यामुळे ही निवडणूक जिंकता आली. त्यामध्ये माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक- निंबाळकर, माधवराव घाटगे यांच्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्याला जनतेने दिलेली साथ यामुळे हे यश मिळाले आहे. यापुढेही जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने महायुती म्हणून कार्यरत राहू. या विजयाबद्दल िजल्हयातील सर्व मतदार बांधव आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत आहे. अशा भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल्या.
