कागल : कागल आणि मुरगुडच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रचारासाठी जात- धर्माचा आधार घेणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचा पलटवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. या माध्यमातून ते स्वर्गीय खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या पुरोगामी विचाराला पायदळी तुडवीत आहेत, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये कोष्टी गल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडी या संयुक्त युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष श्रीमंत समरजीतसिंहराजे घाटगे होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, आज कागल शहरात झालेल्या विरोधकांच्या रॅलीमध्ये खुद्द कागल शहरातील नागरिक किती होते, हे मुख्य बाजारपेठेतील दुकानदार कुतूहलाने बघत होते. परंतु; त्यांना त्या रॅलीमध्ये आपल्या ओळखीचे कोणीच दिसत नव्हते. भाषण करताना मंडलिक यांच्या मागे कोण लागलं होतं की ते इतक्या गडबडीने बोलत होते. ते काय बोलत होते हे उपस्थित नागरिकांनाही समजत नव्हते, अशी त्यांची अवस्था होती. कागल शहरातील रॅलीला काय चित्र होते, हे कागलची जनताच सांगेल. उपमुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लोक जमले होते. परंतु; उपमुख्यमंत्र्यांनी कागलसह मुरगूडचाही आधीच रिपोर्ट घेतला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी येण्यास साफ नकार दिल्याचेही समजते. माझ्यावरील ई. डी. ची कारवाई आणि समरजीतसिंहराजे घाटगे यांच्या जमिनीच्या आरक्षणाचा मुद्दा काढून श्री. मंडलिक शिळ्या कढीलाच नव्याने ऊत आणत आहेत, अशी टीकाही केली.
मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या दहा-बारा वर्षांचा संघर्ष मागे टाकत मी आणि समरजितसिंहराजे घाटगे एकत्र आलो. संघर्ष आणि कटूता कमी होऊन सलोखा आणि विधायकता वाढीस लागेल. संजय मंडलिक यांनी घाई गडबडीच्या भाषणातच पालकमंत्री पदावरून प्रकाश आबिटकर यांना थांबवून राजेश क्षीरसागर यांना पालकमंत्री केल्याबद्दल मंडलिक यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
दहा वर्षातील सर्वात मोठा विनोद…….!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, माजी खासदार संजय मंडलिक यांनी एका मुलाखतीत विधानसभेला त्यांनी मदत केल्यामुळेच मुश्रीफ विजय झाले आहेत, असे ठासून सांगितलेले आहे. संजय मंडलिक व त्यांच्या चिरंजीवांनी विधानसभेला मला निवडून आणल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो, असा उपायसात्मक टोलाही लगावला. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी केलेला गेल्या दहा वर्षातील हा सर्वात मोठा विनोद असल्याची कोपरखळीही मुश्रीफ यांनी मारली.
