टक्केवारीच्या थैलीशाहीचे राजकारण बंद करून गडहिंग्लजला स्वर्ग बनवण्यासाठी राष्ट्रवादीला सत्ता द्या : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगर परिषदेमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून थैलीशाहीचे राजकारण सुरू होते. हे थैलीशाहीचे राजकारण बंद पाडून गडहिंग्लज शहराला स्वर्ग बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

गडहिंग्लज शहरात मांगलेवाडी, भीमनगर व अयोध्यानगर येथे झालेल्या प्रचार सभांमधून मंत्री  मुश्रीफ यांनी विरोधकांवर हा घनाघात केला.

भाषणात मंत्री  मुश्रीफ पुढे म्हणाले, नगरपालिकेवर टक्केवारीच्या मंडळींची सत्ता असल्यामुळे शहराचा विकास खुंटला होता. सुदैवाने या टक्केवारीतील थैलीशहांची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त झाला. या प्रशासक नियुक्तीच्या कालावधीतच गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीने सुमारे १५० कोटी खर्च करून गडहिंग्लजचा विकास साधला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मांगलेवाडी, अयोध्या नगर व भीमनगर येथे पार पडलेल्या प्रचार सभेत मंत्री मुश्रीफ बोलत होते.

उमेदवार अमर मांगले म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली शहरात आणि प्रभागात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. गडहिंग्लजच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन केले. उमेदवार महेश सलवादे यांनी समाजाच्या प्रत्येक अडचणीला मंत्री मुश्रीफ धावून आले आहेत याची दखल घेत यावेळी राष्ट्रवादीला मदत करण्याचे आवाहन केले.

भीमनगरमध्ये झालेल्या प्रचार सभेत  मुश्रीफ म्हणाले, भीम नगर परिसरातील विविध विकास कामांसाठी नऊ कोटीचा निधी दिला. रमाई योजनेअंतर्गत घरकुल बांधून देण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे सांगत यासाठी काही नियमात शिथिलता आणण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे असा आपला प्रयत्न असून सत्तेसाठी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार वळचनीला ठेवणाऱ्यांना यावेळी जागा दाखवण्याची वेळ आल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी ठणकावून सांगितले. माजी नगरसेविका रेश्मा कांबळे यांनी स्वागत केले. आभार किरण म्हेत्री यांनी मानले.

🤙 8080365706