कागल : कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यांचा हाच वारसा जपण्यासाठी नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करणार असल्याचे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात संत रोहिदास चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून शहरासह तालुक्यातील सर्व शाळा डिजिटलायझेशनसाठी ई लर्निंग संच पुरविण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. त्यास नगरपालिकेच्या सत्तेची जोड देऊन नगरपालिकेच्या शाळांमधील सर्व वर्गांमध्ये ई लर्निंग संच पुरवणार आहोत. नगरपालिकेचे शाळेमध्ये सर्वसामान्यांची मुले शिकतात याचा फायदा या मुलांना होईल.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आमदार व मंत्री पदाच्या काळात कागल शहरात कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. गटतट न पाहता शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना दिला. आणखी मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी व नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी नगरपालिकेत राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.
केवळ विरोधासाठी विरोधकांकडून निवडणूक लढवली जात आहे. त्यांच्याकडे कोणताही ठोस मुद्दा नाही. कागल शहराचा सर्वांगीण विकास करण्याची धमक फक्त आमच्या आघाडीमध्ये आहे. ते केवळ अपप्रचार करत आहेत. वेगवेगळी भावनिक आवाहन करत आहेत. त्यांच्या या अपप्रचार व आवाहनाला जनतेने थारा देऊ नये असे स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
यावेळी उमेदवार सविता माने, प्रकाश गाडेकर, सुमन गवळी, जयवंत रावण, राजेंद्र जाधव, विजय काळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
