कोल्हापूर : राजस्थानमधील कोटा व पुण्याच्या धर्तीवर यूपीएससी व एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन केंद्र कागलमध्ये निर्माण करू, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकारेल.
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने व माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांच्या पुढाकाराने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व बक्षीस वितरणही झाले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून आपले करिअर करावे. प्रवेशासाठी जी मदत लागेल ती करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांनी टाळावा. शिक्षणापुरता मोबाईलचा वापर करावा. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच; आई- वडिलांचा धाक गरजेचा आहे असे मत मंत्री मुश्रीफ म्हणाले.
राजस्थानमधील कोटा आणि पुण्यातील कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा जास्त ओढा आहे. तिथे असणाऱ्या सोयीसुविधा आणि त्या कोचिंग क्लासेसची कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी एक कमिटी स्थापन करा. कमिटीने जाऊन या दोन्ही शहरातील कोचिंग क्लासेसचा अभ्यास करून अहवाल सादर करावा. त्यानुसार कागललाही त्या पद्धतीचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन उभारू.
प्राचार्य डॉ . संजयकुमार इंगळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिकणासाठी मार्गदर्शन केले. तसेच; उदय काटकर यांचीही मनोगत झाले.
यावेळी कागल शहरातील रहिवाशी व दृष्टीदोष असलेल्या शिवम चौगुले यांनी आयआयटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्याबद्दल आणि पीएच. डी. करीत असल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार झाला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, रामगोंड पाटील, अतुल जोशी, शुभम चौगुले, नवल बोते, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शितल फराकटे, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संजय चितारी, पी. बी . घाटगे, नामदेवराव पाटील, प्रविण काळबर, ॲड . संग्राम गुरव, नितीन दिंडे, अस्लम मुजावर आदी उपस्थित होते.