कुंभोज (विनोद शिंगे)
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक आमदार डॉ राहुल आवाडे हे उद्योगाच्या अभ्यासासाठी ब्राझील या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. १५ ते २२ जून असा आठ दिवसांचा हा अभ्यास दौरा नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली या सहकारी साखर कारखान्यांच्या राष्ट्रीय संस्थेने आयोजित केला आहे.
ब्राझील हा ऊस, साखर उत्पादन, उपपदार्थ निर्मिती या साखर उद्योगातील महत्त्वाच्या आणि विविध नवनिर्मितीच्या बाबतीत आघाडीचा देश आहे. जगात सर्वाधिक साखरेची निर्मिती ब्राझील देशामध्ये होते. त्याचबरोबर ऊस उत्पादन आणि उपपदार्थ निर्मितीमध्येही या देशाने आधुनिकता जोपासली असून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात अग्रेसर आहे.
या दौऱ्यामध्ये देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींबरोबरच नॅशनल शुगर फेडरेशन, विविध राज्यातील स्टेट शुगर फेडरेशन, शासकीय प्रतिनिधी, ऊस आणि साखर उत्पादनामध्ये संशोधन व मार्गदर्शन करणाऱ्या विविध संस्था, इंजीनियरिंग कंपन्या, व्यावसायिक अशा २६ अभ्यासू प्रतिनिधींचा समावेश आहे.