कुंभोज (विनोद शिंगे): चहा-कॉफीसाठी वापरण्यात येणारे कागदी वप्लास्टिकचे कप शरीरास अपायकारक आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील चहा टपरी, हॉटेलमध्ये चहा-कॉफीसाठी प्लास्टिक व कागदी कप वापरावर बंदीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. डिजिटल बोर्डमुक्त शहरानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी इचलकरंजी महानगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे.
स्थिर फेरीवाला झोन, फिरता फेरीवाला झोन, नो फेरीवाला झोन, मांसाहारी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र झोन, सर्व पथ विक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र, तसेच ओळखपत्र देणे यासह विविध विषयांवर पथ विक्रेता समितीची सभा आयुक्त तथा अध्यक्षा पथ विक्रेता समिती पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत शहरातील पथ विक्रेत्यांसाठी स्थिर, फिरता व नो फेरीवाला झोन निश्चित करण्यात आले. शक्य त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पथ विक्रेत्यांना पट्टे मारण्याचा निर्णय घेण्यात आला.