कागल (प्रतिनिधी):
धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्यासह सकस आहाराकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे त्यांच्यामध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच त्यांचे आरोग्य जपणे व सकस आहार यासाठी आम्ही विविध उपक्रम आयोजित करत आहोत.कारण महिलांचे आरोग्य केवळ कौटुंबिकच नव्हे तर सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.असे प्रतिपादन राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या चेअरमन सौ.नवोदितादेवी घाटगे यांनी केले.
येथे राजे फाउंडेशन,राजमाता जिजाऊ महिला समिती व संकल्पसिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले.यावेळी त्या बोलत होत्या.
विविध वयोगटातील महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात महिलांच्या आरोग्यविषयक अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.सकस आहाराचे नियोजन,नियमित तपासणी, योग आणि मानसिक आरोग्य या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ. शीतल देसाई यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करताना सकस आहार,नियमित व्यायाम व वैद्यकीय तपासणीचे महत्त्व विषद केले.विशेषतः मासिक पाळी,गर्भधारणा,स्तनपान आणि रजोनिवृत्तीच्या काळात योग्य आहाराचे नियोजन अत्यावश्यक आहे.असे सांगितले.
महिलांनी काय खावे व काय टाळावे
सकस व संतुलित आहारासाठी महिलांनी प्रामुख्याने समाविष्ट करावयाच्या बाबीत
लोह व कॅल्शियमसाठी हिरव्या पालेभाज्या,प्रथिनांसाठी डाळी व कडधान्ये,जीवनसत्त्वे व अँटीऑक्सिडंट्ससाठी ताजी फळे, हाडांची मजबुती व कॅल्शियमसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ,फायबरयुक्त व पचनासाठी
सेंद्रिय धान्ये व नाचणी,ज्वारी,बाजरी,
ऊर्जादायी पोषणसाठी काजू,अक्रोड, बदाम,अळीव,तीळ व फ्लॅक्ससीड्स घ्यावे.दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.केवळ महिलांनीच नव्हे तर कुटूंबातील सर्वांनीच साखर,तळलेले पदार्थ,मैदा,शीतपेये,बिस्किटे व फरसाण सारखी बेकरी उत्पादने, डालडा, जंकफुड-फास्ट फुड टाळावे,असे डाॕ.देसाई यांनी आवर्जून सांगितले.
व्यासपीठावर राजे बँकेच्या संचालिका नम्रता कुलकर्णी,जयश्री कोरवी,यांची उपस्थिती होती.
छायाचित्र कागल येथे आयोजित महिलांसाठीच्या मोफत मार्गदर्शन शिबिरात बोलताना राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या चेअरमन सौ.नवोदितादेवी घाटगे