कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी श्री.नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली निवड करणेत आली.
या निवडीनंतर बोलताना गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदी माझी एकमताने निवड करून जो विश्वास माझ्यावर दाखवण्यात आला आहे. त्याबद्दल मी शाहू आघाडीचे सर्व नेते मंडळी, माझे सहकारी संचालक मंडळ तसेच माझ्या शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. मी भविष्यात काम करत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध असून दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था अधिक पारदर्शक व कार्यक्षम राबूवन नव्या तंत्रज्ञानाचा व्यवस्थापन प्रणालींचा समावेश करून गोकुळची गुणवत्ता आणि ब्रँड ची विश्वासार्हता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे. तसेच या दुग्ध व्यवसायामध्ये महिला व युवा शेतकरी अधिक सक्रीय होण्यासाठी त्यांना गोकुळ मार्फत प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असेल.
गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची वाढती मागणी लक्षात घेता येत्या नजीकच्या काळात गडमुडशिंगी येथे TMR प्लाँट विस्तारीकरण व पशुखाद्य कारखान्याचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. तसेच मुंबई, पुणे येथील दूध उत्पादनाची मागणी लक्षात घेता नवी मुंबई वाशी येथे उभारणी केलेल्या १५ मे.टन क्षमतेचा दही प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार असून एन.डी.डी.बी.ची मुंबई येथील जागा घेण्याचा मानस आहे. गायी- म्हैशींच्या गाभण कालावधीच्या शेवटच्या दोन महिन्यासाठी आवश्यक प्रेग्नेसी रेशनचे उत्पादन (पशुखाद्य) घेणेचे नियोजन आहे. नवीन दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती व मार्केट विस्तार या सारखे संघ हिताचे निर्णय सर्वांच्या सहकार्याने घेणार आहे .
मी कोणत्याही गट-तटाच्या पलीकडे जाऊन, “सहकार हा आमचा धर्म” या मूल्याशी प्रामाणिक राहून कार्य करीन. गोकुळ ही संस्था सर्वांसाठी खुली, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे. शेवटी एवढंच – ही निवड ही केवळ माझी नाही, तर आपणा सर्वांच्या विश्वासाची आणि एकतेची निवड असल्याचे मनोगत व्यक्त केले. धन्यवाद !