कोल्हापूर : सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर सेवा रुग्णालय इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे बैठक संपन्न झाली.
कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयामधील ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचे, मंजूर १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, मंजूर १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय तसेच ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट आदी कामांचा विस्तार जागेअभावी प्रलंबित आहे. या संदर्भात बफर झोनमध्ये शिथिलता मिळवून येत्या आठ दिवसांत जागेचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या बरोबरीने सेवा रुग्णालय उभे राहू शकते. त्या भागातील लोकांची गरज लक्षात घेता, व रुग्णसेवेचे महत्त्व विचारात घेऊन, प्रदूषण मंडळाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने आवश्यक प्रस्ताव तयार करावा. जागा उपलब्ध झाल्यास, सीपीआर रुग्णालयास समांतर असे ३५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय त्या ठिकाणी उभारता येईल.’
या बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त महेंद्र पंडित, अॅड. ए. एम. पिरजादे, सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलिमा पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.