कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याला आठ दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने चांगलाच दणका दिला. शेतातील उन्हाळी पिकांचे यामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले. पीक काढणीवेळीच आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. दरम्यान, या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मान्सूनही दाखल होत असल्याने खरीप हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रात रोज पाऊस पडत आहे. कधी मुसळधार; तर कधी अतिमुसळधार पडत असलेल्या या पावसाने शेतात चिखल झाला आहे. सध्या भुईमूग, मका, भात, सूर्यफूल ही पिके काढणीला आली आहेत; पण पावसामुळे शेतात चिखल झाल्याने ते काढणे अशक्य झाले आहे. काही ठिकाणी तर त्यांना कोंब फुटत आहेत. शिरोळ, हातकणंगले, करवीर अशा अनेक तालुक्यांत पिके कुजण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील १३ बंधाऱ्यावर पाणी आले आहे. राधानगरी धरण पन्नास टक्के आताच भरले आहे. कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.