अवयवदानाविषयी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : झोनल ट्रान्सप्लांट कोओर्डीनेशन सेंटरच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थितीत राहिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवयवदान केलेल्या कुटुंबांचे प्रतिनिधी यांचा मनापासून सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कुटुंबांनी आपल्या जिवलग व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही अतिशय कठीण अशा क्षणी समाजभान जपत, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत, एक मोठा निर्णय घेतला मरणोत्तर अवयवदानाचा! एका बाजूला दुःखाचा डोंगर असताना, दुसऱ्या बाजूला अनेक अनोळखी लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण देण्याची ही कृती अत्यंत प्रेरणादायी आहे.
अलीकडच्या काळात अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आज महाराष्ट्रात दरवर्षी 6000 पेक्षा अधिक रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असतात. पण प्रत्यक्षात अवयवदानाचं प्रमाण फक्त 60–70 इतकं अल्प आहे. त्यामुळे अवयवदानाविषयी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
मंत्री आबीटकरांच्या नेतृत्वात आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि नाशिक येथे नव्या झेडसीसी केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. झेडसीसीची टीम, डॉक्टर अंबारडेकर आणि सर्व संबंधित हॉस्पिटल्स अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करत आहेत. पण हे काम केंद्रापुरतं मर्यादित न ठेवता – हे एक मिशन म्हणून हाती घेणं आवश्यक आहे.
यासाठी हॉस्पिटल्सने केवळ सहभाग नव्हे, तर पुढाकार घ्यावा, योग्य काउन्सलिंगद्वारे कुटुंबीयांमधील भीती दूर करावी, ग्रामीण भागात जागरूकतेसाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, समाजात पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करावा असे मत त्यांनी मांडले.

हे संपूर्ण कार्य ही केवळ वैद्यकीय बाब नाही, तर ही मानवतेची, जबाबदारीची, आणि सामाजिक बदलाची चळवळ आहे. या कार्यक्रमात मी पाहिलं की किती कुटुंबांच्या जीवनात एक आशेचा किरण, एक नवजीवन याच निर्णयामुळे आलं. माझ्या दैनंदिन धावपळीच्या वेळापत्रकातही मी हा कार्यक्रम वेळ काढून हजर राहिलो. कारण हे कार्य माझ्या आरोग्यमंत्री पदाच्या पलीकडचं आहे. हे माणूस म्हणून माझं कर्तव्य आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, महाराष्ट्र हे राज्य अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे.असे मंत्री आबिटकर म्हणाले.

🤙 9921334545