उचगाव गावातील खेळाडूंसाठी क्रीडांगणसाठी परवानगी द्या;उचगाव ग्रामपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : मौजे उचगाव, (ता. करवीर) येथील सरकार वहिवाट असलेल्या गट नं.२६४/१ क्षेत्र ३.३९ आर पैकी १.३५ आर क्षेत्र प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर यांना भाडेतत्वावर ३० वर्षांसाठी २००२ पासून दिलेला आहे. म्हणजेच सदर संस्थेस सन २०३२ पर्यंत भाडेतत्वावर देण्यात आले आहे.

परंतु बेकायदेशीर रित्या सदर संस्थेमार्फत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी सन २०२४ पासून १५ वर्षे भाडेकरार केलेला आहे. सदर संस्थेमार्फत जमीन सन २०३९ पर्यंत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला बेकायदेशीर रित्या दिलेली आहे. सदर करारपत्र करते वेळी सदर संस्थेने शासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच स्थानिक स्वराज संस्था ग्रामपंचायत उचगाव असताना ही आम्हास कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना दिलेली नसून परस्पर रित्या करारपत्र केले आहे. त्या आधारे क्रिडांगणाचे काम चालू केलेले आहे. ते त्वरित थांबविण्याचे आदेश करण्यात यावेत. अशी मागणी ग्रामपंचायत उचगाव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सदर भाडेकरार करण्यास संस्थेस दि. १५/०६/२००९ रोजी अप्पर सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांनी दिलेल्या अटी शर्तीतील अट क्र. १ व २ चा भंग करून शासनाच्या जमिनीचा करारपत्र हस्तांतरित करण्यात आलेले आहे. त्यामुळे अटी व शर्तीचा भंग करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचा करारपत्र रद्द करून सदर जमिनी ग्रामपंचायत उचगाव व सर्व ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार सदर जागा हि ग्रामपंचायतकडे वर्ग करून सदर गावातील खेळाडूसाठी क्रिडांगण तयार करणेसाठी परवानगी मिळावी. अशी विनंती करण्यात आली

🤙 9921334545