कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विधासभेला यश मिळाल्यानंतर महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीतील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत, त्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा शब्द दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही नगरसेवक शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.
तोच धागा पकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. काँग्रेसचे केवळ 10 नगरसेवक येणार नसून तब्बल 35 नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टप्याटप्याने क्षेपणास्त्र डागून विरोधकांचे राजकीय ताल उद्ध्वस्त करणार असल्याचही क्षीरसागरांनी स्पष्ट केले. क्षीरसागर यांनी केलेल्या दाव्यामुळे सतेज पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे.