कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी, कोल्हापूर येथे ‘श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था प्रधान कार्यालया’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचा मागील व यावर्षीचाही नेट एनपीए शून्य आहे. संस्थेचा निव्वळ नफा मागील वर्षी ₹3 कोटी आणि यावर्षी ₹2 कोटी 90 लाख आहे. संस्थेच्या ठेवी मागील वर्षी ₹186 कोटी व यावर्षी ₹222 कोटी इतक्या झाल्या आहेत. संस्थेची गुंतवणुकही चांगल्या प्रकारे वाढली आहे.”
कुठलीही सहकारी संस्था विश्वस्त भावनेने चालवली पाहिजे. सचोटीने, योग्य प्रकारे काम होऊन संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदत करता आली पाहिजे. उद्योग, व्यापार उभे राहिले पाहिजे. हे करत असताना संस्थेतील पैसा जनतेचा असल्याने तो सुरक्षित राहिला पाहिजे, अशा विचाराने ही पतसंस्था चालत असल्याने संस्थेची सातत्याने उत्तरोत्तर प्रगती होत आहे. ही पतसंस्था सहकारी संस्थेच्या नियमांवर, निकषांवर अतिशय उत्तम काम करत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यंदा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असून यानिमित्ताने देश आणि राज्यात सहकाराला मजबूत करण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती केली. त्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेसारख्या संस्था इतरांनाही निश्चितपणे प्रेरित करतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“चांगल्या संस्था निर्माण झाल्या तर त्यातून समाजाचे भले होते, वित्तीय समावेशनासाठी याचा फायदा होत असतो, असे सांगत श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेची उत्तरोत्तर आणखी प्रगती होत राहो”, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तसेच संस्थेच्या ठेवी ₹500 कोटी इतक्या झाल्यानंतर पुन्हा येण्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. राहुल आवाडे, श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.