सावर्डे दुमालात आनंददायी बाल पुस्तकालयाचे उदघाट्न

म्हालसवडे / प्रतिनिधी

लेखक हा सांगण्याचा नाही तर वाचण्याचा विषय आहे. वाचनामुळेच लेखन करू शकलो आणि त्यामुळेच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त करू शकलो. लहानपणी आम्हाला पुस्तके वाचायला मिळाली नाहीत. एका खोलीत चार वर्ग बसायचे. तुम्ही नशीबवान आहात तुमच्या शाळेत बालपुस्तकालय आहे. बालमनावर वाचन संस्कार रुजविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम असून तो सर्वांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, रिंगाण कादंबरीचे लेखक कृष्णात खोत यांनी केले.

सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या संकल्पनेतून लोकसहभागातून उभारलेल्या ‘ आनंददायी बाल पुस्तकालया’ च्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सार्थ एज्यूकेशन सोसायटी कोल्हापूरचे डॉ.दिलीप माळी होते. यावेळी दिलीप माळी, कृष्णात पाटील, दीपक कुंभार यांचेकडून पुस्तके भेट देण्यात आली.

लेखक खोत पुढे म्हणाले, चुकीच्या गोष्टींचे अनुकरण वाढल्याने ग्रामीण जीवन, ग्रामीण घरपण हरवत चालले आहे. घर छोटं – अंगण मोठं हे विसरून घर मोठं – अंगण छोटं याकडे झुकलो आहोत. मोबाईलची आभासी झुल फेकून दिली पाहिजे. आजकाल स्वतः काही न करता दुसऱ्याला नुसतं सांगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुलांनो गाईडचा वापर करू नका. दुसऱ्याचे बघून लिहण्याची सवय वाईट आहे. महिला पालक जर वाचक बनली मुलेही
वाचकप्रिय बनायला वेळ लागणार नाही.

डॉ.दिलीप माळी म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील शाळा समितीने सुरू केलेला हा उपक्रम नाविण्यपूर्ण असून इतर शाळांसाठी अनुकरणीय असा आहे. एक आदर्श बाल पुस्तकालय कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तकालय आहे. यासाठी आवश्यक तेवढी पुस्तके तर देणार आहोतच शिवाय शाळेच्या अन्य कामातही सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

प्रास्ताविक भाषणात शाळा समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पुस्तकालयाची संकल्पना, स्वरूप व गरज विशद केली. संदीप पाडळकर यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद पाटील, निलेश कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी करवीरचे सभापती पांडुरंग पाटील, सरपंच भगवान रोटे, शाळा समिती उपाध्यक्ष मनोहर पाटील, पंकज गुरव, तुषार निकम, गणपती कांबळे, निवृत्ती कारंडे, सर्जेराव भोसले, नामदेव नलवडे, अजित निकम, रघुनाथ खाडे, गणेश भोसले यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, विद्या मंदिर सावर्डे व माध्यमिक विद्यालय सावर्डे – सडोली शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत शरद दिवसे यांनी तर आभार मुख्याध्यापक संतोष कलढोणे यांनी मानले.