कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील कामे तसेच सीपीआर रुग्णालयातील विकास कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करा. नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी होण्यासाठी नियोजनबद्ध काम करा, असे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी निर्देश दिले.
शेंडा पार्क परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रस्ते बांधिव गटर व फूटपाथचे काम, जमीन सपाटीकरण व सुशोभीकरण, बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्टचे बांधकाम, फॉरेन्सिक विभागाची इमारत, 125 निवासी डॉक्टर्स व 125 आंतरवासिता (महिला व पुरुष) यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहाची इमारत, 150 परिचारिकांसाठी वसतीगृह व वार्षिक 100 क्षमतेचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, विद्युत व फर्निचर काम, 150 मुली व 150 मुलांसाठी वसतिगृह इमारत बांधकाम व फर्निचर काम, प्रस्तावित 600 खाटांचे सामान्य रुग्णालय, 250 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय, 250 खाटांच्या कर्करोग रुग्णालयासाठी काँक्रीट रस्ता तयार करणे आदी कामे जलद गतीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसर व सीपीआर रुग्णालयातील विकास कामाबाबत माझ्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथील अधिष्ठाता कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, सीपीआर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, मनीष पवार, भाऊसाहेब हजारे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरजू रुग्णांसाठी सीपीआर महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे. रुग्णांना चांगल्यात चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी सीपीआर परिसरातील सर्व विकासकामे जलद पूर्ण करा. उत्तुर येथील योगा सर्वोपचार केंद्र, सांगाव येथील आयुर्वेद हॉस्पिटल व पिंपळगाव येथील होमिओपॅथी हॉस्पिटल इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया गतीने राबवा. शेंडा पार्क परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामे गतीने मार्गी लावा. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी अंदाजपत्रक सादर करा, अशा सूचना यावेळी दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात पूर्ण झालेली कामे सुरु असणारी कामे व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेतला.
अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी विकास कामे पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.