कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते आणि मनस्वी चित्रकार स्व.चंद्रकांत मांडरे यांनी स्वतःचा राहता बंगला 1987 साली महाराष्ट्र शासनाला कलासंग्रहालय निर्मितीसाठी दान केला आहे. या ठिकाणी मांडरे यांनी रेखाटलेल्या विविध जलरंग आणि तैलरंगातील चित्रांचे कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यात आले आहे.
या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या संग्रहालयाला आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मांडरे कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेत नूतनीकरण करण्याऐवजी संपूर्ण इमारत नव्याने उभारण्याची गरज समोर आली. या संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी दिला. यावेळी पृथ्वीराज मांडरे, उदय सुर्वे, सहाय्यक अधीक्षक यदुराज पाटील उपस्थित होते.