अमृत ठेकेदारावर महापालिका मेहेरबान का? : शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे

कोल्हापूर : अमृत योजनेतंर्गत ११५ कोटींची कामे कोल्हापूर शहरात सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाली तर शहरवासियांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे. मात्र अमृत योजनेच्या ठेकेदाराला तीनवेळा मुदतवाढ देऊनही ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. तसेच संबंधित ठेकेदाराला महापालिकेने ठोठावलेला दंडही त्या बीलातून वसूल केला जात नाही. त्या उलट ठेकेदाराला जास्तीत जास्त बील अदा करण्यासाठी अधिकार्यांची एक यंत्रणा कामाला लागलेली असते. मग अमृत ठेकेदारावर महापालिका एवढी मेहेरबान का? असा सवाल शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी उपस्थित केला आहे. प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने त्यासंदर्भात महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले आहे.

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा जुनाट आहे. पाणी वितरणासाठीच्या जलवाहिन्या जुनाट आहेत. परिणामी गळतीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यासाठी अंतर्गत वितरण व्यवस्था बदलणे आवश्यक आहे. अमृत योजनेसाठी ठेकेदाराला १ सप्टेंबर २०१८ ला वर्कऑर्डर देण्यात आली. ३१ मार्च २०२४ अखेर चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही मुदतवाढ दिली आहे. परंतू अद्याप काम पूर्ण झालेले नाही. अमृत योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना थेट पाईपलाईनचे पाणी पूर्ण क्षमतेने मिळणार आहे. तब्बल ४८८ कोटींची थेट पाईपलाईन योजना मार्गी लागली. मात्र त्याचे पाणी शहरात सर्वांना मिळण्यासाठी वितरण व्यवस्था नाही. त्यासाठी अमृत योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतू योजना रखडली आहे.
योजनेतंर्गत होणारी आणि अपुर्ण असलेली कामे… ८८ किलोमीटर जलवाहिन्या, प्रस्तावित पाण्याच्या उंच टाक्या सम्राटनगर – १३.५० लाख लिटर्स, ताराबाई पार्क – १६.१० लाख लिटर्स , बोंद्रेनगर – १३.५० लाख लिटर्स, पुईखडी – २० लाख लिटर्स, शिवाजी पार्क – ८ लाख लिटर्स, बावडा रॉ वॉटर – ७ लाख लिटर्स, आपटेनगर – १८.३० लाख लिटर्स ही कामे अपूर्ण आहेत.

🤙 9921334545