कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेअंतर्गत रु. ६५ लाखांच्या निधीतून एकूण १५३ सीसीटीव्ही कॅमेरे रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये बसविण्यात आले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते पार पडला.
या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, प्रशासकीय अधिकारी श्री. राजेश पाटील, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, प्रमोद पोवार, कपिल शेटके, विजय पाटील, तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेमुळे रुग्णालयाचा संपूर्ण परिसर २४ तास निगराणीखाली राहणार असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनांवर तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे. विशेषतः गर्दीचे ठिकाण, आपत्कालीन विभाग, औषध वितरण केंद्रे आणि इतर संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना म्हणालो, “सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवणे हे आपले प्राधान्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णालय प्रशासनासोबत नागरिकांनाही विश्वासार्हता मिळेल. यामुळे रुग्णालयातील कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध बनेल.”