कुंभोज येथे ३ में पासून श्री हिवरखान – बिरदेवाची त्रैवार्षिक जळाची परडी यात्रा

कुंभोज  (विनोद शिंगे)

महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री हिवरखान – बिरदेवाची त्रैवार्षिक जळाची परडी यात्रा ३ में ते ५ में २०२५ मध्ये होणार आहे. ही जळाची परडी यात्रा प्रशासन व भाविकांच्या सहकार्याने पार पाडणार आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती समस्त धनगर समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये सांगण्यात आली.

 

 

 

यावर्षी बुधवार दि. ३० एप्रिल रोजी अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी मुहूर्तमेढ रोवणे, शनिवार दि.३ में रोजी श्री हिवरखान – बिरदेवाच्या जळाच्या परडी यात्रेला प्रारंभ होणार असून दुपारी १२ वाजता श्री हिवरखान – बिरदेवाची जळाची परडी पाजळणे व रात्री १२ वाजता श्री हिवरखान – बिरदेवाच्या पालखीचे रथातून भव्य मिरवणूक व आतिषबाजी करण्यात येणार आहे.

रविवार दि.४ में रोजी भरयात्रेचा मुख्य दिवस सवाद्य मिरवणुकीने गावातील प्रमुख मार्गावरून श्री हिवरखान – बिरदेवाच्या पालखीचे मंदिरात आगमन होणार आहे. सोमवार दि.५ में रोजी यात्रेचा समारोप म्हणजे भंडारा फोडणे यादिवशी सवाद्य मिरवणुकीने गावातून श्री हिवरखान – बिरदेवाच्या पालखीचे देवमाळीत प्रस्थान होणार आहे तसेच ३ में ते ५ में सलग तीन दिवस महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यात्रा काळात धार्मिक व पारंपारिक कार्यक्रम होणार आहेत तसेच धनगर समाजाच्या झालेल्या बैठकीमध्ये यात्रा काळात डिजिटल फलकांवरती बंदी घालण्यात आली आहे . गट ,तट व राजकीय नेत्यांच्या पोस्टर वाॅरमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडून यात्रा काळात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी डिजिटल फलकांवर बंदी घालण्यात आली आहे. यावेळी समस्त धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.