कोल्हापूर : कै.का.मा.आगवणे (दादा) यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्य आयोजित विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय समाजाभिमुख कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान समारंभा आयोजन रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे करण्यात आले होते.
‘राजकारण्यांचे कार्य समाजासमोर येतच असते. त्यापेक्षा अधिक प्राधान्याने समाजाभिमुख काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्य समोर आले पाहिजे. जेणेकरून त्याचा आदर्श समाज घेईल’, ज्येष्ठ समाजवादी नेते दिवंगत का.मा.आगवणे यांचे कार्य त्यांच्या पुढील पिढीने चांगल्या पध्दतीने समोर आणले आहे, असे गौरवोद्गारही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.
‘कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त समाजासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काम गौरवास्पद आहे. त्यांच्याकडून असेच कार्य इथून पुढेही व्हावे, अशी अपेक्षा आहे. समाजात सर्वच बिघडले आहे, अशा स्वरूपाचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. अशा वातावरणात असे काम व कार्यक्रम होणे काळाची गरज आहे. दिवंगत का. मा. आगवणे यांनी जीवनातील सर्वच भूमिका चांगल्या पद्धतीने वटविल्या. त्या पुढील पिढीने अतिशय चांगल्या पद्धतीने समोर आणल्या आहेत.असे हि ते यावेळी म्हणाले.
यावेळी अशोक रोकडे (जीवनमुक्ती सेवा संस्था, व्हाईट आमों), विजय टिपुगडे (कलासाधना मंच), शिवदास भोसले (अग्रणी पाणी फाउंडेशन, सांगली), युवराज कदम (वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्था), प्रभाकर पाटील (आमचा गाव, आमचा विकास संस्था) यांचा देणगी व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
त्याचबरोबर का. मा. आगवणे यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणीचे तरंग’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जेष्ठ साहित्यीक डॉ.सुनिलकुमार लवटे, ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, कुसुम आगवणे, सुनीता आगवणे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.