कुंभोज(विनोद शिंगे)
कृष्णा योजना जलवाहिनीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल. जर नुकसान झालेच तर त्याची भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी शिरढोणवासियांना दिली. त्यामुळे शिरढोण येथे दोन दिवसांपासून बंद पडलेले जलवाहिनी बदलाचे काम आमदार आवाडे यांच्या संवादामुळे पुनश्च सुरु झाले आहे.
कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलाचे काम सध्या सुरु असून शिरढोण येथील बस थांबा ते माळभाग याठिकाणी राखीव आहे. याठिकाणी मक्तेदाराकडून चुकीच्या पध्दतीने खुदाई केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या कामास शिरढोणातील ग्रामस्थ आणि पदाधिकार्यांनी विरोध दर्शवत काम थांबविले होते. त्यामुळे दोन दिवस हे काम थांबले होते. याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी शिरढोण येथे जाऊन ग्रामस्थ आणि संबंधित पदाधिकार्यांची भेट घेत संवाद साधला. ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांचे त्यांनी समाधानकारक प्रतिसाद देत शंका दूर केल्या. कृष्णा जलवाहिनीमुळे गावाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. त्यामुळे चांगल्या विकासकामांमध्ये चुकीच्या गैरसमजातून अडथळा निर्माण होऊ नये, याची सर्वांची दक्षता घेऊया. त्यावर ग्रामस्थांच्या मागणीवर आमदार आवाडे यांनी, जलवाहिनीच्या कामामुळे गावाला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई आमदार निधीतून किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करुन देऊ, अशी ग्वाही दिली. आमदार आवाडे यांनी संवाद साधत केलेल्या शंका निरसनामुळे ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आणि त्यानंतर रखडलेले काम पुन्हा गतीमान झाले.
याप्रसंगी सरपंच शर्मिला टाकवडे, उपसरपंच शिवानंद कोरबू, इचलकरंजी महानगरपालिकेचे अभियंता बाजी कांबळे, जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चाचुर्डे, मक्तेदार मौला बागवान, विवेक कोरे, ग्रामपंचायत सदस्य भास्कर कुंभार, शक्ती पाटील, रवी कांबळे, संभाजी कोळी, सागर भंडारे, प्रवीण दानोळे, नागेश कोळी, पोपट पुजारी, सुरेश सासणे, शहाबुद्दीन टाकवडे, अरुण ऐनापुरे, शशिकांत चौधरी, उमेश ऐनापुरे, अशोक दानोळे, रामचंद्र अडगाणे, राजू शेख, अमीर शेख, सुरज खिलारे, शाहिद बानदार, बिरू व्हसपाटे, गणपती कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.