कोल्हापूर : बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास राजू शेट्टी यांनी भेट दिली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊसशेतीचे नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे.
या कृषी विज्ञान केंद्रास भेट देवून संपुर्णAI तंत्रज्ञानाची माहिती घेतली. देशामध्ये उस शेतीतून साखर व इतर उपपदार्थ उद्योगामधून जवळपास १ लाख कोटी रूपयाची वार्षिक उलाढाल आहे. ज्याप्रमाणात केंद्र व राज्य सरकारला साखर उद्योगातून कर मिळतो , रोजगार निर्मीती होते त्याप्रमाणात सरकारने उस शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानावर भर दिलेले नाही. बारामती कृषी विकास केंद्रामार्फत मायक्रोसॅाफ्ट व अन्य कंपन्यांच्या सहकार्याने ऊस शेतीमध्ये AI टेक्नॅालॅाजीचा वापर करून ऊस शेती उत्पादनात अमुलाग्र बदल केला आहे.
उस पिकाचे उत्पादन घेत असताना जमीनीचा पोत , सापेक्षा आद्रता , तापमान याबरोबरच अन्न निर्मीती ,पाणी , औषध फवारणी , किड परिक्षण यामधून पिकाची गुणवत्ता वाढविण्यासाठीचे तंत्रज्ञानाची निर्मीती कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात AI मधून करण्यात आलेली आहे. राज्यातील व देशातील ऊस उत्पादक शेतक-यांना हे तंत्रज्ञान दिशादर्शक असून पिकाची गुणवत्ता व उत्पादन याबाबत या माध्यमातून ताळमेळ घालता येणे सहज शक्य आहे. सध्या जरी या तंत्रज्ञानाचा खर्च जास्त वाटत असला तरी राज्य व केंद्र सरकारने याला प्रोत्साहन देवून सदरचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या पर्यंत पोहचविले पाहिजे.
जमीनीचा पोत टिकविण्याकरिता व उत्पादन वाढिकरिता मातीचा सेंद्रीय कर्ब हा सर्वात महत्वपुर्ण घटक आहे.हवामानात होणारे बदल , खतांचा व पाण्याचा अनियंत्रीत वापर यामुळे जमिनीचा पोत खराब झालेला आहे. यापुढील काळात शेतक-यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करणे गरजेचे आहे.
बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्र्स्टने राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले कार्य नक्कीच उस उत्पादक शेतक-यांना दिशा देणारे आहे.