ज्ञानसंक्रमणात अनुवादित साहित्याची भूमिका महत्त्वाची: डॉ. रघुनाथ ढमकले

कोल्हापूर: ज्ञानाच्या संक्रमणामध्ये अनुवादित साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी आज केले.प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात “अध्ययन साहित्याचे भाषांतर” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांबळे होते.

 

 

डॉ. ढमकले म्हणाले, भाषांतर ही केवळ कला नसून ती सर्जनशील नवनिर्मिती असते. एका भाषेतील ज्ञान दुसऱ्या भाषेमध्ये नेऊन भाषेसह माणूस समृद्ध करण्याचे काम या माध्यमातून होते. अनुवाद प्रक्रियेमुळेच सामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचू शकते.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. कांबळे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय ज्ञानाच्या प्रसाराला महत्त्व देण्यात आले आहे. त्याचे योग्य उपयोजन करण्यासाठी अध्ययन साहित्य स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे.

शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या  समन्वयक डॉ. रूपाली संकपाळ कार्यशाळेचे प्रयोजन स्पष्ट केले. बन्सी होवाळे व आरती पाटील यांनी परिचय करून दिला. प्रतिक्षा माने व दर्शना डोकरमारे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.

यावेळी सरस्वती कांबळे, आनंदा कुंभार, अर्चना कुराडे, अंजली गायकवाड, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, संजय चव्हाण उपस्थित होते. विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.