मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला ; आ. अमल महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : राज्यभरातील बेरोजगारांसाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना विद्यावेतन देण्यात येते. सहा महिन्यांचा हा कालावधी वाढवावा तसेच विद्यावेतन ऐवजी मासिक मानधन द्यावे अशी मागणी प्रशिक्षणार्थींच्या शिष्टमंडळाने आ. अमल महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली होती.

ही बाब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर 2 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने इतका वाढवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींच्या मागण्या बऱ्याच अंशी मान्य झाल्या आहेत. या निर्णयाचा लाभ राज्यभरातील लाखो युवा बेरोजगारांना होणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.