कोल्हापूर : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या तर्फे दिनांक ७ मार्च २०२५ रोजी कोल्हापुरातील जेष्ठ तबला वादक डॉ. नंदकुमार जोशी यांची पारंपारिक घराणेदार रचना व बंदिशी या विषयावर एक दिवसीय तबला कार्यशाळा संपन्न झाली.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. यावेळी डॉ नंदकुमार जोशी यांचा स्वागत व सत्कार अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केला. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. जोशी यांनी तबला वादनातील पेशकार, तिस्त्र व चतस्त्र जातीचे कायदे व रेले विद्यार्थ्यांना शिकवले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अनागत अतित, एकमुखी गत, चक्रधार गत इ. रचनांची विद्यार्थ्यांकडून पढंत करून घेऊन त्या रचनेचा निकास विद्यार्थ्यांना शिकवला. या कार्यशाळेला अधिविभागातील तसेच बाहेरील संस्थांमधील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यशाळेच्या शेवटी डॉ. जोशी यांनी रियाज पद्धती साथसंगत व स्वतंत्र तबला वादन या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिविभागातील प्रदीप कुलकर्णी यांनी केले व या कार्यशाळेचे आयोजन प्रशांत देसाई, सचिन कचोटे यांनी केले.