कोल्हापूर : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शनिवार, दि.1 मार्च 2025 पासून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले.
महापालिकेच्यावतीने दरवर्षी शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येते. यामध्ये आरोग्याच्या 60 सफाई कर्मचा-यांमार्फत 476 लहान नाले, जेसीबीच्या सहाय्याने 236 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये दोन जेसीबी मशीनद्वारे कनाननगर, फुलेवाडी रिंगरोड, शिवशक्ति कॉलनी, अहिल्यादेवी होळकरनगर, ठोंबरे मळा, वेटाळे मळा, कसबा बावडा, सुर्वे नगर अशा 10 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तर मनुष्यबळ याद्वारे चंद्रेश्वर, रंकाळा स्टँण्ड, रंकाळा तलाव, सानेगुरुजी वसाहत, कसबा बावडा, शुगर मिल, फुलेवाडी रिंग रोड, कसबा बावडा पूर्व, सूर्वेनगर व हनुमान मंदिर परिसर या ठिकाणच्या 8 प्रभागातील 47 चॅनेलची सफाई पुर्ण करण्यात आली आहे. तसेच मोठया नाल्यांची सफाई करण्यासाठी 2 पोकलँड मशीन भाडेने घेणेबाबतची निविदा प्रक्रिया सुरु असून येत्या 15 दिवसात शहरातील मोठया नाल्यांची सफाईही सुरु करण्यात येत आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.