कोल्हापूर – उत्तुर ता. आजरा ग्रामपंचायतीची साडेबारा लाख रुपयांच्या थकित वीजबिलामुळे ग्रामपंचायतीला नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत कनेक्शन मिळणे थांबले होते. त्यावर इलाज म्हणून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून थकीत वीजबिलाची निम्मी रक्कम म्हणजेच सव्वा सहा लाख रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीला देण्यात आला. सरपंच किरण अमनगी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हा धनादेश स्वीकारला. उर्वरित सव्वा सहा लाख रुपये ग्रामपंचायतीकडून व्यवस्था करून थकीत वीजबिल भरले जाणार आहे. यामुळे नवीन झालेल्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत जोडणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत बोलताना सरपंच किरण अमनगी म्हणाले, उत्तुरसारख्या १५ हजार लोकसंख्येच्या गावासाठी आंबेओहोळ प्रकल्पावरून नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आलेली आहे. परंतु; जुन्या योजनेच्या साडेबारा लाख रुपये वीजबिलाच्या थकबाकीमुळे नवीन कनेक्शन मिळणे अडचणीचे झाले होते. यावर पर्याय म्हणून निम्म्या रकमेची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आणि निम्मी रक्कम नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यामुळे लवकरच जलजीवन योजनेची वीजजोडणी होऊन ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि उत्तूरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पिण्याचा पाणीपुरवठा होईल.
यावेळी सरपंच किरण आमनगी, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, आजरा साखर कारखान्याची माजी संचालक मारुती घोरपडे, मिलींद कोळेकर, महेश करंबळी, संजय उत्तूरकर, सविता कुरुणकर , सुनिता हत्तीरगे, लता गुरव, सौ. आशा पाटील, सुवर्णा नाईक, सुनिल रावन, सुधीर सावंत ग्रामस्थ उपस्थित होते.