कोल्हापूर : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी,मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात करून आज पर्यंत अनेक विक्रम नोंदवले आहेत. अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे.
यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले “पूर्वी मठावर शिवरात्रीला दर्शनाला आजूबाजूचे भाविक यायचे पण आता देशभरातून लाखो लोकांची पाऊले मठाकडे वळत आहेत. परमपूज्य स्वामीजींचे कार्य देशभरात विस्तारलेले आहे, याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी येतो. अध्यात्माला सामाजिक कार्याची जोड दिल्यामुळे मठ सामाजिक कार्यासाठी अधिक ओळखला जातो. स्वामीजींच्या सारख्या कर्मयोगी संतांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले तर कोल्हापूरचे नव्हे तर राज्यभरात कार्याचा आदर्श घालून देता येईल. स्वामीजींच्या सामाजिक कार्यात आम्हाला सहभागी होऊन सेवा करण्याची ग्वाही यावेळी मी व्यक्त करतो.”
यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गोकुळ दुध संघ संचालक नंदकुमार ढेंगे, विश्वस्त उदय सावंत, विवेकराव पाटील, जालंदर पाटील, शरद सावंत, राजन पाठारे, संतोष पाटील, बाळकृष्ण विचारे, डॉ.वर्षा पाटील, डॉ.प्रकाश भरमगौडर, डॉ.तनिष पाटील, डॉ.शीतल गवळी, डॉ.भाग्यश्री पालकर, विक्रम पाटील, विवेक सिद्ध, संजय पाटील, डॉ.संदीप पाटील, बापू कोंडेकर, माणिक पाटील चुयेकर, नामदेव बामणे, दिवाकर पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून आलेले हजारो भाविक उपस्थित होते.
