मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीएसआर फॉर चेंज : अॅक्सलरेटिंग शेड्युल्ड ट्राईब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप’ हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9.5% आदिवासी समुदाय असल्याचे सांगत, त्यांच्या संस्कृतीच्या समृद्धीला अधोरेखित केले. केंद्र व राज्य सरकार आदिवासी समुदायाच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, पोषण आणि उपजीविका अशा विविध आघाड्यांवर अनेक योजना राबवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संगितले. माता व बालकांना पोषक आहार प्राप्त करून देण्यापासून ते मुला-मुलींच्या नामांकित शाळेत प्रवेश आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था देखील सरकार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात सीएसआर पार्टनर्सनी आदिवासी विकास क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य, शिक्षण, पोषण आणि उपजीविका अशा विविध क्षेत्रात एकत्र येऊन या आघाड्यांवर परिणामकारक काम करण्याची क्षमता सीएसआर पार्टनर्ससमोर अधोरेखित केली. यासोबतच राज्यात 78% सीएसआर हा एमएमआर क्षेत्रामध्ये खर्च होत असून, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ‘पॅन महाराष्ट्र अॅप्रोच’ स्वीकारल्यास विकासाची बेटे तयार न होता निश्चितपणे समग्र अशा प्रकारचा विकास करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री डॉ. अशोक उइके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यूएनडीपीचे तसेच संबंधित अधिकारी आणि सीएसआर पार्टनर्स उपस्थित होते.

