दूध उत्पादकांशी संवाद साधण्याचे ‘गोकुळ कट्टा’ प्रभावी माध्यम

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या यशस्वी दूध उत्पादकांची यशोगाथा इतर दूध उत्पादकांना समजावी व दुग्ध व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संघामार्फत ‘गोकुळ कट्टा’ या माहिती देणाऱ्या स्टुडीओची उभारणी संघाच्या ताराबाई पार्क येथे केली आहे. याचे उद्‌घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थिती संपन्न झाला.

 

 

 यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले कि, गोकुळने नेहमीच किफायतशीर दुग्ध व्यवसाय होण्यासाठी दूध उत्पादकांना विविध घटकांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे. तरूण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित व्हावा यासाठी त्याला दुग्ध व्यवसायातील सर्वकष माहितीसाठी ‘गोकुळ कट्टा’ प्रभावी माध्यम असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले.

 यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ कट्टयाच्या माध्यमातून संघाच्या विविध योजना, उपक्रम, जिल्ह्यातील यशस्वी दूध उत्पादकांच्या व गोकुळश्री विजेते यांच्या यशोगाथा व मुलाखती दूध उत्पादकांना मिळाव्या यासाठी गोकुळने ‘गोकुळ कट्टा’ (स्टुडिओ) तयार केला असून निश्चितच या स्टुडीओचा लाभ गोकुळ च्या दूध उत्पादकांना होईल असे मनोगत व्यक्त केले.

          या गोकुळ कट्टयाच्या रचनेमध्ये गाय, म्हैस, वैरण, मुक्त गोटा, दूध उत्पादक, दूध संस्था, बल्क कुलर युनिट या प्रतीकृतींचा समावेश करण्यात आला आहे.

याप्रसंगी आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.