शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘इन्फोसिस’चा कॅम्पस ड्राइव्ह

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात  इन्फोसिस कंपनीच्या वतीने दोनदिवसीय कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाचे संचालक डॉ. राजन पडवळ यांनी ही माहिती दिली.

 

इन्फोसिसच्या या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी ऑनलाईन पद्धतीने सुमारे २२०० उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. अभियांत्रिकी पदवीधरांसह गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र विषयांत एम.एस्सी. आणि एमसीए झालेल्या उमेदवारांचा यात समावेश आहे. यापैकी सुमारे १२०० जणांनी पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडलेल्या उमेदवारांसाठी उद्या सकाळी ९ वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात प्लेसमेंटपूर्व मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे.

यावेळी इन्फोसिसचे वरिष्ठ अधिकारी उमेदवारांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर दिवसभरात दोन बॅचेसमध्ये उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतील. तंत्रज्ञान अधिविभाग, संख्याशास्त्र अधिविभाग आणि आय.जी.टी.आर. कक्ष (भूगोल अधिविभाग) येथे या परीक्षा होतील. या चाळणी परीक्षेत यशस्वी झालेल्या निवडक उमेदवारांच्या बुधवारी (दि. १९) प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येतील.