कोल्हापूर : केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले आहेत. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नासंबंधी एक व्यापक स्वरूपाची बैठक नितीन यांच्या समवेत घेण्यात आली या बैठकीला खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहून विविध प्रश्नांबद्दल सविस्तर चर्चा केली.
कोल्हापूर शहरातील रस्त्यासंबंधीचा महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. कोल्हापूर तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असल्यामुळे लाखो भाविक येत असतात. त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी नेहमीच ट्राफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शहरांतर्गत कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेले ‘तावडे हॉटेल ते शिवाजी पूल’ या ठिकाणी ‘उड्डाणपूल’ व्हावे यासाठी आमदार अमल महाडिक अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. या मागणीला गडकरी यांनी तत्वता मान्यता दिली आहे. यासाठी महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत लवकर या संबंधित आराखडा तयार करा व यासंबंधीचा संपूर्ण निधी केंद्र सरकार मार्फत दिला जाईल. असा विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी दिला.
तसेच गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर शहराला भेडसवणारा प्रश्न म्हणजे महापूर होय. या महापुरामुळे कोल्हापूर शहरात पाणी शिरून शहरातील कोट्यावधी रुपयाचे नुकसान होत आहे. या महापुरासंबंधित कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शिरोलीपासून कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारापर्यंत ‘एलिव्हेटेड उड्डाणपूल’ सोबतच ‘बास्केट ब्रिज’ हा जवळपास सव्वाचार किलोमीटर लांबीचा मार्ग कोल्हापूर शहरात प्रवेश करेल व पुढे उचगाव पर्यंत तयार करण्यात यावा. तसेच कागल हद्दीत कागल शहराला जाणारा एक मार्ग 1.2 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल होईल. या सर्व कामासाठी लागणारा एकूण निधी 624 कोटी रुपयांचा आहे. यासाठीची मंजुरी नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. व या सर्व कामासंबंधीच्या निविदा लवकरच प्रकाशित करण्यात येतील व हे काम लवकर सुरू करण्यात येईल या प्रकल्पामुळे पुन्हा कधीही कोल्हापूर शहराला महापुराचा फटका बसणार नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी व व्यापारी यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. असे दोन मोठे प्रकल्प मंजूर केल्याबद्दल गडकरी यांचे महाडिक यांनी अभिनंदन व आभार मानले.
तसेच गडहिंग्लज व आजरा शहराला जो रस्ता तयार झाला आहे त्यासाठी रिंग रोड व्हावा यासाठीचा प्रस्ताव व पीएम ई-बस सेवा योजनेतून 100 बसेस मंजूर झाले आहेत. त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाचा वापर होणार आहे त्यासाठी भरण्यात येणाऱ्या रक्कमेमध्ये सूट मिळावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली या सर्व मागण्यांना गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या बैठकीला आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे , मनपा आयुक्त . के. मंजूलक्ष्मीजी भाजपाचे अध्यक्ष पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.