कुंभोज (विनोद शिंगे)
नगरोथ्यान रस्ते विकास प्रकल्पामध्ये मंजूर असलेल्या शहापूर मधील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम गेले दोन महिन्यापासून बंद आहे, याचा पाठपुरावा शहापूर मधील नागरिकांच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेले आहे. परंतु सदरच्या निवेदनांना केराची टोपली दाखवण्यातच सरकारी बाबूंनी धन्यता मांडली आणि याच गोष्टीचे पडसाद आज हातकणंगले सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये उमटले.
इचलकरंजी युवासेना तसेच राजू कबाडे (सरकार) युवाशक्ती यांच्या वतीने उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले यांना, जर शुक्रवार २१ फेब्रुवारी पर्यंत रस्त्याच्या बांधकामास सुरुवात झाली नाही तर जबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधी मक्तेदार यांच्या तोंडाला काळ फासण्याचा सज्जड इशारा देण्यात आला.
सदरील प्रस्तावित रस्त्यांमध्ये श्रीम्हसोबा मंदिर ते यल्लमा मंदिर, योगाश्रम मंदिर ते तारदाळ नाका, अहिल्यादेवी होळकर शाळा रस्ता तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सांगली नाका हा रस्ता प्रस्तावित असून ०१ एप्रिल रोजी शहापूरचे ग्रामदैवत श्रीम्हसोबा देवाची यात्रा असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने शहापूर मध्ये येत असतात.
सदरील मंजूर असणाऱ्या रस्त्यांपैकी श्रीम्हसोबा मंदिर ते यल्लमा मंदिर पर्यंतच्या रस्त्याचा वापर हा दंडवत घालणे तसेच ग्रामदैवत श्रीम्हसोबाच्या पालखीचा मुख्य मार्ग असलेकारणाने या रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे, या आशयाचे निवेदन राजू कबाडे व रतन वाझे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
या निवेदनावर बोलताना उप-अभियंता शिवाजी पाटील यांनी तात्काळ या निवेदनाची दखल घेत त्वरित रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले.यावेळी इम्तियाज शेख, नितीन सुतार, ऋषिकेश कुरणे, अमोल कबाडे, राजगोंड पाटील, प्रशांत कुराडे, उपस्थित होते.