सक्षम अभिव्यक्तीसाठी शब्दातील भाव समजून घ्या : तुषार भद्रे

कोल्हापूर :  शब्द हे अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. सक्षम अभिव्यक्तीसाठी शब्दातील भाव ओळखता आला पाहिजे, असे मत प्रसिद्ध उच्चार शास्त्र तज्ज्ञ तुषार भद्रे यांनी व्यक्त केले.शिवाजी विद्यापिठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन आणि दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीएम उषा योजनेअंतर्गत ‘इ- कन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड ऑनलाईन पेडागॉगी’ कार्यशाळेत  ते बोलत होते.
प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. कार्यशाळेची भूमिका दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे  प्र-संचालक डॉ. के. बी. पाटील यांनी स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. सुमेधा साळुंखे यांनी केले. पाहुण्याची ओळख जयप्रकाश पाटील यांनी करून दिली .
तुषार भद्रे म्हणाले, श्वास हा जीवनामध्ये महत्वाचा घटक आहे. आवाजाचे संवर्धन श्वासावर अवलंबून आहे. स्वरांमधून भावना व्यक्त होतात. माहिती  सर्वांजवळ असते पण ती रंजक पद्धतीने मांडता आली पाहिजे. संवाद हा हृदयापासून हृदयापर्यंत झाला पाहिजे. श्वसनाचे व्यायाम का आणि कसे करावे, श्वसनावर नियंत्रण कसे ठेवावे, याविषयी प्रात्यक्षिक करून घेत त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे दिली. आभार डॉ. प्रकाश बेळीकट्टी यांनी मानले. या कार्यशाळेमध्ये दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे, सहाय्य्क कुलसचिव ए. आर. कुंभार, अनुप जत्राटकर, डॉ. नितीन रणदिवे, नाझिया मुल्लाणी, डॉ. मुफीद  जमादार, बबन पाटोळे, डॉ. संजय चोपडे, डॉ. तानाजी घागरे, उदय पाटील, डॉ. प्रकाश मुंज मास कम्युनिकेश आणि बी. ए. फिल्म मेकिंग चे विद्यार्थी उपस्थित होते.
उद्याची कार्यशाळा दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केन्द्र येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून या कार्यशाळेसाठी  पुणे इएमआरसीचे सहाय्यक निर्माता मिलिंद पाटील मार्गदर्शन करणार आहेत.